संत श्री ज्ञानेश्वर

Thursday, January 14, 2010 0 comments

‘नमितो योगी, थोर विरागी तत्त्वज्ञानी संत। तो सत् कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत।।’
- श्रीस्वरूपानंद स्वामी
संत ज्ञानेश्वर म्हणजे सुमारे ७२५ वर्षांपूर्वी महाराष्ट्राला पडलेले सुंदर आध्यात्मिक स्वप्न! महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील, परमार्थाच्या क्षेत्रातील ‘न भूतो न भविष्यति’ असे अजोड व्यक्तिमत्त्व व अलौकिक चरित्र म्हणजे संत ज्ञानेश्वर! गेली सुमारे ७२५ वर्षे महाराष्ट्रातील सर्व पिढ्यांतील, सर्व स्तरांतील समाजाने जे व्यक्तिमत्त्व आपल्या मनोमंदिरात एक अढळ श्रद्धास्थान म्हणून जपले आहे; आणि जे श्रद्धास्थान पुढील असंख्य पिढ्यांतही कायमच अढळ व उच्चस्थानी राहणार आहे; असे एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर!

ब्रम्ह साम्राज्य चक्रवर्ती, मती गुंग करून टाकणारी अलौकिक काव्य प्रतिभा लाभलेला रससिद्ध महाकवी, महान तत्त्वज्ञ, श्रेष्ठ संत, सकल विश्र्वाचे कल्याण चिंतणारा भूतदयावादी परमेश्वरभक्त, पूर्ण ज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीक, श्रीविठ्ठलाचा प्राणसखा - अशा शब्दांत त्यांचे वर्णन केले जाते. परंतु त्यांचे परिपूर्ण वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडल्याचेही जाणवते. संत चोखामेळा पुढील शब्दांत त्यांना वंदन करतात.

‘कर जोडोनिया दोन्ही। चोखा जातो लोटांगणी।।
महाविष्णूचा अवतार। प्राणसखा ज्ञानेश्वर।।’

`प्राणसखा' हा अतिशय वेगळा, सुंदर व समर्पक शब्द चोखोबांनी (तेराव्या शतकात) संत ज्ञानेश्वरांबद्दल वापरला आहे.

‘शूचीनाम श्रीमतां गेहे, योगभ्रष्टोऽभिजायते’ (भगवद् गीता ६.४१) अशा पवित्र कुळात त्यांचा जन्म आपेगाव येथे तेराव्या शतकात, मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी, शके ११९७ (इ.स. १२७५) रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी व त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होत. गोविंदपंत व मीराबाई हे त्यांचे आजोबा-आजी होत. निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू. निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांचा जन्म अनुक्रमे शके ११९५, ११९९ व १२०१ मध्ये झाला. (काही अभ्यासकांच्या मते निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई या सर्व भावंडांचा जन्म आळंदी येथेच अनुक्रमे शके ११९०, ११९३, ११९६ व ११९९ मध्ये झाला.) आपेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटे गाव आहे. श्री विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्यासी होते. त्यांनी संन्यास घेतल्यानंतर गुरुच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केला. त्यांना चार अपत्ये झाली. श्री निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे होत. विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत श्री क्षेत्र आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले. अलंकापुरी (आळंदी) हे सिद्धपीठ होते. त्या काळी संन्यासाची मुले म्हणून सर्व समाज या चौघा भावंडांची हेटाळणी करीत असे. परित्यक्त ब्राह्मण म्हणून त्यांना काळ कंठावा लागला. श्रीज्ञानेश्र्वरांच्या आई-वडिलांनी देहांत प्रायश्र्चित घेतले. त्यांचे वडीलबंधू कृपासिंधू निवृत्तीनाथ हे भावंडांचे सर्वेसर्वा होते.

श्री निवृत्तीनाथ हेच संत ज्ञानेश्र्वरांचे सद्गुरू होते. नेवासा क्षेत्रात आपल्या सदगुरूंच्या कृपाशीर्वादाने भगवद् गीतेवर त्यांनी प्रख्यात टीका लिहिली. (संत ज्ञानेश्र्वरांनी ही टीका सांगितली व सच्चिदानंद बाबा यांनी लिहिली.) या ग्रंथास ‘ज्ञानेश्वरी’ किंवा ‘भावार्थदीपिका’ असे म्हणतात. हे मराठी वाङ्मयाचे देशीकार लेणे झाले आहे. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ‘ज्ञान’, श्री संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले.

माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। (ज्ञाने - ६.१४)

असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे. सर्व स्तरांतील लोकांना ही ‘ज्ञानेश्वरी’ भुरळ घालते. मराठी भाषेतील हा अद्वितीय ग्रंथ आहे. विचार, भावना, आशयाची खोली, अलंकाराचे श्रेष्ठत्व, अद्वैतानुभूती, भक्तीचा ओलावा, रससंपन्नता या सर्वच बाबतीत ज्ञानेश्वरीने उंची गाठलेली आहे. ‘पसायदान’ ही विश्वकल्याणाची प्रार्थना म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या वैश्विक सद्भावनेचा, तसेच प्रतिभेचा परमोच्च साक्षात्कार आहे. कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग सांगणार्‍या ग्रंथराज ज्ञानेश्वरीत सुमारे ९००० ओव्या आहेत. हा ग्रंथ इ.स. १२९० मध्ये लिहिला गेल्याचे मानले जाते. ज्ञानेश्वरीबद्दल आचार्य विनोबा भावे म्हणतात, ‘मराठी साहित्य वजा (-) ज्ञानेश्वरी बरोबर (=) शून्य’. तर संत नामदेव महाराज म्हणतात,

‘नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी। एक तरी ओवी अनुभवावी।।’

त्यांचा दुसरा ग्रंथ ‘अनुभवामृत’ किंवा ‘अमृतानुभव’ होय. हा विशुद्ध तत्त्वज्ञानाचा, जीव-ब‘ह्म ऐक्याचा ग्रंथ आहे. सुमारे ८०० ओव्या (दहा प्रकरणे) या ग्रंथात आहेत. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्रेष्ठ ग्रंथ आहे.
‘चांगदेव पासष्टी’ या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेवांचे गर्वहरण करून त्यांना उपदेश केला. चांगदेव हे महान योगी १४०० वर्षे जगले असे मानले जाते. पण यांचा अहंकार गेला नव्हता. यासाठी संत ज्ञानेश्र्वरांनी उपदेशपर लिहिलेले ६५ ओव्यांचे पत्र म्हणजे चांगदेव पासष्टी हा ग्रंथ होय.यात अद्वैताचे अप्रतिम दर्शन आहे. संत ज्ञानेश्वरांचा ‘हरिपाठ’ (अभंगात्मक,२८ अभंग) हा नामपाठ आहे. यात हरिनामाचे महत्त्व सांगितले आहे. ही वारकर्‍यांची त्रिकाल संध्याच होय. हे अभंग आशयसंपन्न तर आहेतच परंतु प्रत्यक्ष अनुभूतिसंपन्न आहेत. हरिप्राप्तीचे सोपे सुलभ साधन म्हणजे नामस्मरण होय, असेच हरिपाठ सांगतो. भक्तीला ज्ञानेश्वरांनी पंचम पुरुषार्थ मानले आहे. ‘कर्मे ईशु भजावा’ हाच त्यांचा कर्मयोग व भक्तियोग आहे. त्यांच्या वाङ्मयाला परतत्त्वाचा स्पर्श झालेला आहे. वाङमयीन सौंदर्य व गुणविशेषांबरोबरच मराठीचा अभिमान, संयम, उदात्तता, नम्रता, त्यांचे निर्मळ चारित्र्य, सर्वसमावेशकता, वात्सल्य, भक्तिपरता आणि कालातीतता - असे अनेक गुणविशेष त्यांच्या साहित्यातून आपल्याला अनुभवण्यास मिळतात. ज्ञानदेवांसह सर्व भावंडांवर तत्कालीन समाजाने प्रचंड अन्याय केला, पण त्या अन्यायाबद्दलची पुसटशी प्रतिक्रियादेखील त्यांच्या साहित्यात आढळत नाही, हे विशेष!

`ज्ञानदेव म्हणजे माय मराठीचे हृदय! निसर्ग हाच श्रीकृष्ण, जाणीव हाच अर्जुन, यांच्या संवादातला मर्माभ्यास ही ज्ञानेश्वरी. जाणिवेच्या पातळीवरील सखोल चिंतन ही चांगदेव पासष्टी. मननाचा मन:पूत महोत्सव हाच अमृतानुभव. मानसिक शुद्ध स्नान म्हणजे हरिपाठ. सगुण अनुभवाची कोजागिरी म्हणजे ज्ञानदेवांची भजने होत', अशा समृद्ध शब्दांत ज्येष्ठ अभ्यासक यशवंत पाठक संत ज्ञानेश्वरांचे व त्यांच्या साहित्याचे वर्णन करतात.

‘जो जे वांछिल, तो ते लाहो’ असे म्हणत अखिल विश्वाची जणू काळजी वाहणार्‍या संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने ‘माउली’ म्हणतात. त्यांनी धर्मातील क्लिष्ट अवडंबरे काढून धर्माला कर्तव्याचा वेगळा अर्थ दिला. वाङ्मय निर्मितीबरोबरच त्यांनी आध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवण्याचा यशस्वी प्रयत्न चंद्रभागेच्या वाळवंटात केला. भागवत धर्माचा तथा वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे अभूतपूर्व कार्य त्यांनी केले. संत नामदेव, संत गोरोबा कुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, संत चोखामेळा या समकालीन संत प्रभावळीचे अनौपचारीक नेतृत्व करत, संत ज्ञानेश्वरांनी अध्यात्माच्या क्षेत्रात समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.

‘अमृतानुभव’ या ग्रंथाच्या लेखनानंतर संत ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रा केली. संत नामदेव महाराजांच्या ‘तीर्थावली’ मध्ये या तीर्थयात्रेचा उल्लेख आढळतो. या यात्रेनंतर माउलींनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. संत नामदेवांच्या ‘समाधीच्या अभंगां’मध्ये तत्कालीन संदर्भ सापडतात. अन्य संतांची मानसिक स्थिती, त्यांच्यासह समाजाला झालेले दु:ख, खुद्द नामदेव महाराजांच्या वेदना, ज्ञानेश्वरांचा संयम आणि निग्रह - या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब समाधीच्या अभंगांत आढळते.

संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या पावन तीरावर संजीवन समाधी घेतली (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दूर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६, गुरुवार). हा ‘ज्ञानसूर्य’ मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. ज्येष्ठ कवी बा. भ. बोरकर संजीवन समाधीनंतरच्या वातावरणाचे वर्णन पुढील यथार्थ शब्दांत करतात. -

‘ज्ञानदेव गेले तेव्हा, कोसळली ‘भिंत’,
वेद झाले रानभरी, गोंधळले संत.’
Read the full story

समर्थ रामदास

शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे। वशिष्ठापरि ज्ञान योगेश्र्वराचे।
कवि वाल्मिकासारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरू रामदासा।।

परमार्थ, स्वधर्मप्रेम, राष्ट्रप्रेम, संघटन, प्रबोधन, समाजकारण, राजकारण, प्रपंच, काव्य, साहित्य, बलोपासना अशा अनेक विषयांचे सर्वस्पर्शी कर्ते, भाष्यकार आणि द्रष्टे, पुरोगामी राष्ट्रसंत म्हणजे समर्थ रामदास स्वामी!

श्री समर्थ रामदासांचा जन्म मराठवाड्यातील जांब येथे ठोसरांच्या घरात झाला. हे सूर्योपासक घराणे होते. समर्थांचे पाळण्यातले नाव नारायण. बालपणापासून नारायण आपल्या विचारांनी, आचारांनी असामान्य वाटत होता. नारायणाने लग्नाच्या बोहल्यावरून आत्मोध्दारासाठी नाशिक पुण्यक्षेत्री धाव घेतली. दक्षिण गंगा गोदावरीचा पावन परिसस्पर्श अनुभवला व प्रभू श्रीरामचंद्राचे सान्निध्यही अनुभवले. गायत्रीमंत्राचे पुरश्र्चरण व रामनामाचे १२ कोटी वेळा नामस्मरण करून अवतार कार्याला आरंभ केला. साक्षात प्रभू श्रीराम हेच त्यांचे सद्‌गुरू झाले.

‘धर्म संस्थापना जगजीवना। भरतखंडी करणे असे।’ यासाठी त्यांनी कठोर तपाचरण केले. टाकळी येथे संगमावर १२वर्षे तपाचरण केले. ‘श्रीराम जयराम जय जय राम’ हा मंत्र धारण केला. भारतभर तीर्थयात्रा केल्या. संपूर्ण देश पाहून परिस्थितीचा अंदाज घेतला. ‘मराठा तितुका मेळवावा। महाराष्ट्र धर्म वाढवावा।’ यासाठी त्यांनी काया झिजविली. हरिकथा निरूपण, राजकारण; सावधपण व साक्षेप या तत्त्वांच्या आधारे कार्य करणारा ‘रामदासी’ संप्रदाय त्यांनी निर्माण केला. या माध्यमातून संघटना बांधत, त्यांनी कार्य सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.

समर्थ रामदासांच्या ‘जय जय रघुवीर समर्थ’ या गर्जनेने मरगळलेला महाराष्ट्र जागा झाला. दर्‍या-खोर्‍यातून; डोंगर कपारीतून एकच नाद घुमला. सह्याद्रीच नव्हे तर गंगा-यमुना आणि कावेरीची खोरीही या घोषणेने दणाणून टाकली. आसेतुहिमाचल मठ-महंत निर्माण करून, नि:स्पृह नेतृत्व समाजात निर्माण करून त्यांनी राष्ट्र उभारणीच्या कार्याला पूरक असे कार्य साधले. धर्मसत्ता व राजसत्ता यांचा अपूर्व समन्वय साधून सशक्त तरुणांची मने राष्ट्रवादाने भारून टाकली. प्रभू श्रीरामचंद्र, आदिशक्ती तुळजाभवानी आणि शक्ती उपासनेसाठी मारुतीराया या तीन देवतांचा जागर त्यांनी समाजात मांडला. समर्थांनी स्थापन केलेल्या केवळ श्री मारूती मंदिरांचा (त्या संख्येचा) अंदाज जरी आपण घेतला, तरी आपल्याला थक्क व्हायला होते. अक्षरश: शेकडो मंदिरांची स्थापना त्यांनी केली. स्वत: डोंगरदर्‍यात, घळीत राहून समाजाचे व देशाच्या कल्याणाचेच चिंतन केले. समाजातील प्रत्येक घटकाला, अनेक अनाथ, निराधार बालकांना, स्त्रियांना सन्मार्गाचा, आत्मोद्धाराचा मार्ग दाखविला. प्रपंच आणि परमार्थ नेटका करण्यासाठी विवेकसंपन्न व्हा, असा उपदेश केला. आनंदवनभुवनाचे स्वप्न पाहिले. हिंदुस्थान बलसंपन्न व्हावा यासाठीच क्षात्रतेज व ब्राह्मतेज जागविले.

‘सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे। परंतु, तेथे अधिष्ठान पाहिजे। भगवंताचे।’ या त्यांच्याच सूत्रानूसार भगवंताचे अधिष्ठान असलेली चळवळ निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकोत्तर कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन स्वराज्य बलशाली व्हावे म्हणून समाजसंघटन करून राष्ट्रउभारणीच्या कार्याला मोलाची मदत केली. सहिष्णू व जयिष्णू धर्माचा समन्वय साधून रामराज्याचा मंत्र जागविला.

समर्थांनी राष्ट्रउभारणीसाठी जसे बहुमोल मार्गदर्शन केले तसेच लोकशिक्षण, प्रपंच, परमार्थ, विवेक या गोष्टींवरही भर दिला कारण यातूनच राष्ट्र उभे राहते, स्वराज्य स्थापन होते. लोकांनी साक्षर व्हावे यासाठी त्यांनी लिहिण्याची , वाचण्याची मोहीम काढली. आपल्या वचनात ते म्हणतात- ‘दिसा माजी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे’ त्याचबरोबर त्यांनी असेही सांगितले -
जे जे आपणासि ठावे। ते ते इतरांसि शिकवावे। शहाणे करून सोडावे सकळ जन।।
प्रपंच सोडून जर परमार्थ केला, तर केवळ आत्मोन्नती होईल परंतु प्रपंच करून परमार्थ केला, तर राष्ट्रोन्नती होईल म्हणून ते म्हणतात की -

प्रपंची जे सावधन। तोचि परमार्थ करील जाण।
प्रपंची जो अप्रमाण। तो परमार्थी खोटा।।

समर्थांनी साहित्य, कला, आरोग्य, जीवनशैली, निसर्ग, बांधकाम, उद्योग या विषयांवरही लिहिले आहे. जीवनाचे कोणतेही अंग समर्थांनी सोडलेले नाही. सर्वच क्षेत्रांत उच्च ध्येय गाठण्यासाठी, यश मिळवण्यासाठी काय करावे, याचे तपशीलवार मार्गदर्शन समर्थ करतात.

परळी येथे मठस्थापना करताना मठाच्या परिसरात बाग करण्यात येत होती त्या वेळी त्यांनी बागेवरती एक अखंड प्रकरणच लिहीले. तसेच सामानगडावर किल्ले बांधताना लिहिलेल्या ‘कारखाने’ या प्रकरणाच्या पहिल्या समासात विटा कशा कराव्यात, बांधकाम या प्रकरणात मजुरांना कशी , किती कामे द्यावीत यासारखी सर्व माहिती त्यांनी दिली आहे.

याशिवाय गाणे कसे असावे हे सांगताना समर्थ लिहितात,

बाळके श्वापदे पक्षी। लोभती वेधती मनी।
चित्त निश्चिंत होतही। धन्य ते गायनी कळा।।

मराठी (प्राकृत) भाषेचा अभिमानही समर्थ व्यक्त करतात. समर्थ लिहितात,

‘येक म्हणजी मर्‍हाठी काय। हे तो भल्यासी ऐको नये।
ती मूर्ख नेणती सोय। अर्थान्वयाची।।
लोहाची मांदूस केली। नाना रत्ने साठविली।
ती अभाग्याने त्यागिली। लोखंड म्हणोनी।
तैसी भाषा प्राकृत।।’

असे अनेक विषय त्यांच्या साहित्यात आहेत. समर्थांची मराठी भाषा ही मोजक्याच पण ठसठशीत शब्दांत सर्व काही सांगणारी भाषा आहे. समृद्ध शब्दरचना, मराठी शब्दांची वैभवशाली उधळण, तर्कशुद्ध विचारांची रेखीव, नेटकी मांडणी आणि माणसाच्या जीवनाचे, अगदी छोट्या-छोट्या व्यवहारांचे सूक्ष्म निरीक्षण (अन्‌ त्याचे प्रकटीकरण) ही समर्थांच्या साहित्याची आणखी काही वैशिष्ट्ये! विशिष्ट लय, गेयता हीदेखील त्यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये होत. त्यामुळे अगदी सर्वसामान्यांना पण त्यांचे काव्य सहज मुखोद्गत होते. त्यांच्या साहित्यातील प्रत्येक वचन हे स्वानुभवातून आलेले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक शब्दाला वजन आहे. समर्थांची काव्यरचना आणि तिचे साहित्यगुण हा खरे तर स्वतंत्र अभ्यासाचाच विषय आहे.

विविध विषयांतून लीलया समाजप्रबोधन करणार्‍या समर्थांचे हे सर्व करीत असताना मुख्य उद्दिष्ट होते हिंदवी स्वराज्य! त्यासाठीच त्यांनी देशात हलकल्लोळ माजवला. शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीचा पाया भक्कम करण्याचे काम समर्थांमुळे सोपे झाले आणि या महाराष्ट्राच्या भुवनी आनंदवन उदयास आले.

सातारा, चाफळ, सज्जनगड या परिसरात समर्थांचे वास्तव्य अधिक काळ होते. समर्थ स्थापित राम मंदिर, अकरा मारूतींची मंदिरे याच परिसरात आहेत. ‘दासबोधा’ चे लेखन त्यांनी रायगडाजवळील शिवथरघळीत बसून केले. चाफळ परिसरात समर्थांची व छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाल्याचे उल्लेख इतिहासात आढळतात. परमार्थ, अध्यात्म, श्रीराम व श्रीहनुमान भक्ती आणि संपूर्ण समाजाचा ‘नेटका प्रपंच’ या सर्वच बाबतीत स्वत: अत्युच्च स्थान गाठून समाजाला मार्गदर्शन करणार्‍या (आजही मार्गदर्शक ठरणार्‍या) समर्थांनी इ.स. १६८१ मध्ये सज्जनगडावर समाधी घेतली.

जय जय रघुवीर समर्थ!

समर्थांचे वाङ्‌मय:
`श्रीमत्‌ ग्रंथराज दासबोध' या पारमार्थिक ग्रंथाची रचना शिवथरघळ (महाडजवळील) येथे केली.
आत्माराम ग्रंथ, मनाचे श्र्लोक (मनोबोध), करुणाष्टके, सवाया, अभंग, पदे-चौपदी.
काही स्‍फूटरचना, भीमरूपी, मारुतीस्तोत्र, अनेक आरत्या .
Read the full story

शिवाजी महाराजांचा चित्रमय इतिहास !

Sunday, January 10, 2010 1 comments















Read the full story